शंभर मिनिटे

खिडकीच्या उघड्या दारातून पहाटेचा गार वारा येतो. पाच मिनिटे. अजून फक्त पाच मिनिटे. हे मनात दोनदा म्हणून झालं की बाकी मी उठून बसतो. बाहेर कधी नव्हे ती शांतता असते. अजून अंधार आहे, पूर्वेला फटफटलेलंही नाही. पंखा बंद केला तरी चालेल – करावाच- थंड हवा. उठावं.
चहा. सकाळच्या चहाचा पहिला घोट- सुखाच्या कल्पनांमध्ये खांडेकरांनी हा उल्लेख केला आहे. सकाळच्या डाकेने आलेलं दोनच ओळींचे पत्र – रस्त्यावरुन जाताना ऐकू आलेल्या ‘हरीभजनावीण काळ घालवू नको रे..’ या ओळी असं काहीबाही होतं त्या यादीत.. बाकी काही आठवत नाही आता.
नेटवर थोडीशी उलथापालथ. पूर्वी चहा-पेपर हे समीकरण असे; आता ते चहा-जीमेल असं झालं आहे. मी खिडकीतून बाहेर बघतो. पक्षांचे आवाज सुरु झालेत, एखादी खारही चिवचिवते. चला, ब्राह्ममुहूर्तावर बाहेर पडायला हवं. मिलिंद बोकील म्हणतात तशी हीच ती वेळ. ब्राह्ममुहूर्त. प्रस्थान ठेवण्याची वेळ. शतकानुशतके ते सर्व पुरुष याच वेळेला घराबाहेर पडले. बाकी सगळं जग झोपलेलं असताना. अर्थात ते परत न येण्यासाठी. सर्व थोर पुरुष घराबाहेर पडले ती हीच ती वेळ.आपल्याला परतही यायचं आहे आणि आपण काही थोरबीर नाही. तरीही चला. बूट चढवून, कानाला बोंडुक लावून मी बाहेर पडतो. कोरी चुनरिया आतमा मोरी मैल है मायाजाल, वो दुनिया मोरा बाबुल का घर, ये दुनिया ससुराल.. रात्री पाऊस होऊन गेलेला दिसतोय. रस्ते ओले आहेत. रस्ते झाडणारे लोक अर्धवट उजेडात बाकी त्या ओल्या रस्त्यांवरचा कचरा झाडूने गोळा करताहेत. प्लॅस्टिकच्या पिशव्या, गुटख्याची पाकिटे , कागदाचे कपटे… सगळं गोळा करुन मोठ्या हातगाड्यांत भरताहेत. हे खरे हीरोज. इतरांनी केलेली घाण उचलणारे, उन्हापावसात काम करणारे हे खरे हीरोज. यांना सलाम करायला पाहिजे…याबरोबर भल्या सकाळी वर्तमानपत्रे टाकणारे, घरोघरी दूध पोचवणारे हे खरे हीरोज. गुले गुलजार क्यूं बेजार नजर आता है, चष्म-ए-बद का शिकार यार नजर आता है, छुपा ना हाल-ए-दिल सुना दे तू, तेरी हसीं की कीमत क्या है, ये बता दे तू… क्या बात है,चष्म-ए-बद हा किती सुंदर शब्द आहे… प्राणचा अभिनय एरवी खरं तर थोडा लाऊडच असतो, पण काहीकाही रोलमध्ये बाकी.. परिचय! तेच म्हटलं नाव कसं काय आठवत नाही आपल्याला..या मध्यमवयीन बायका इतक्या हळू हळू का चालतात? अहो, ताशी पाच किलोमिटर इतका वेग ठेवला पाहिजे. पाच नाहीतर किमान चार. आणि चालताना सारखं बोलू नये. पण यांचं आपलं सारखं ‘गवार आवडत नाही हो कुणाला, तिची जाऊ आहे दीनानाथला अ‍ॅडमिट, घनश्यामला आता वाईट वाटायला लागलंय, डिझाईन आवडलं नाही तुला गाडगिळांकडचं?…’ एक ना दोन…आपण पुढे निघावं. ये चुप भी एक सवाल है अजीब दिल का हाल है हर एक खयाल खो गया की बस अब यही खयाल है की फासला ना कुछ रहे हमारे दरमियां…पायाखालचं थोडं थोडं दिसायला लागलंय. एकदा का सकाळी कुत्र्यांना फिरवणारी मंडळी रस्त्यांवर आली की बघून पावलं टाकायला लागतात. आमीर खानला सांगायला पाहिजे, हेपण घे तुझ्या कार्यक्रमात म्हणून. कहीं दर्द के सहरा में, रुकते चलते होते इन होंठों की हसरत में, तपते जलते होते मेहरबान हो गयी, ज़ुल्फ़ की बदलियाँ… काय शब्द आहेत नाही!. हिंदी गाणी नसती तर आपलं काय झालं असतं? हिंदी, मराठीपण…त्रिशूल डमरु पिनाकपानी चंद्रकला शिरी, सर्प गळयातूनी युगायुगाचा भणंग जोगी, तोच आवडे मनी… इंग्रजी गाणी बाकी आवडून घ्यायचं वय निघून गेलं. पण तरी तीन भाषा येतात म्हणायला हरकत नाही. काल काय म्हणाला तो टीव्हीवर.. तीन भाषा येतात तो मल्टिलिंग्विस्ट, दोन येतात तो बायलिंग्विस्ट, आणि एकच येते तो… अमेरिकन! चला, आपले अमेरिकन मित्र पिसाळणार आता…उस देस में तेरे परदेस में सोनेचांदी के बदले में बिकते है दिल, इस गाव में दर्द की छांव में, प्यार के नाम पर ही धडकते है दिल….हे ऐकलं की डोळ्यांसमोर ते शॉट येतात. गाण्याचे शब्द, चाल, गायकी याबरोबर त्याच्या पिक्चरायझेशनमुळंपण बरीच गाणी लक्षात राहिली आहेत. एका बाजूला झोपडपट्टीत सगळे मस्तीत गाताहेत, त्यांच्यातलाच एक गवळी मुखडा गुणगुणत सायकलवरुन दुसरीकडे जातो आणि मग तिथं आपल्या घराच्या दारात बसलेली नायिका ते गाणं पुढं सुरु करते ‘याद आती रही, दिल दुखाती रही, अपने मन को मनाना ना आया हमें, तू न आये तो क्या, भूल जाये तो क्या प्यार करके भुलाया ना आया हमें..’ ही खरी दिग्दर्शकाची क्रिएटिव्हिटी…
जब जीरो दिया मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आयी, तारोंकी भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई, देता न दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था, धरती और चांद की दूरी का, अंदाजा लगाना मुश्किल था.. ‘चुप क्यूं को गये? और सुनाओ..’ मदन पुरीचा आवाज. हे भरदार मर्दानी आवाजाचे लोक कुठे गेले? सप्रू, मुराद, के.एन. सिंग… आता हृतिक रोशनचा आवाज नायकाचा म्हणून खपवून घ्यायला लागतो…यौवनाच्या खुणा मिरवत चाललेल्या या तरुणी, खालचा ओठ लोंबता ठेवून काठीवर रेलत, खुरडत चाललेला हा म्हातारा, कुत्र्याला फिरवायला आणणारा त्रासिक चेहर्‍याचा हा तरुण आणि त्याच्याहूनही त्रासिक चेहर्‍याचा हा त्याचा कुत्रा…’देख लिया कहां रहता हूं? जहां मौत जिंदगी से खेलती है..’ ‘वो दिन दूर नही दीपक, जब जिंदगी मौत से खेलेगी’ ‘लेकिन कब? कैसे?’ ‘मालूम नही, चलो मुझे घर पहुंचा दो..’ हा ‘मालूम’ खास मीनाकुमारीचा. ‘दिलकी सदापे ऐ सनम, बढते गये मेरे कदम अब तो चाहे जो भी हो, दिल तुझे मै दे चुकी’ काय जोडी आहे! मीनाकुमारी बरोबर अजित? हम तुम्ही लिक्विड ऑक्सिजनमे डाल देंगे, लिक्विड तुम्हे जीने जही देंगा और ऑक्सिजन तुम्हे मरने नही देंगा..पण गाणं सुरेख आहे..’ जागे ना कोई, रैना है थोडी, बोले छमाछम, पायल निगोडी’ यातल्या निगोडीच्या आधीचा पॉज आणि त्यातली तबला आणि सतार यांची जुगलबंदी याला तोड नाही. नाधिनधिनना, नाधिनधिनना, नाधिनधिनना, नाधिनधिनना… गुलाम महंमद हा संगीतकारपण इतका दुर्लक्षित का रहावा कळत नाही… आणि मिर्जा गालिबमधली सगळीच गाणी.. मै भी मूंह में जुबान रखता हूं, काश पूछो की मुद्दआ क्या है.. जुबान रखना ही उर्दूची नजाकत. तोंडात जीभ आहे.. मराठीचा सगळा रासवट कारभार… राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा…काहेको बजाये तू मीठी मीठी ताने….हे गाणं बासरीवर वाजवायला सोपं आहे असं आपला एक मित्र म्हणतो. पण काय बासरी आहे! सालं आपल्याला एखादं वाद्य वाजवायला येत असेल शपथ! हे देव म्हणजे तरी हरामखोर की हो! नको तिथं नेऊन घालतंय बघा सगळं….
ओळखीचे चेहरे दिसू लागले आहेत. अनोळखी माणसांना नमस्कार-बिमस्कार करायची काय आपली संस्कृती नाही. नाही म्हणायला टेकडीवर रोज भेटणारे एक आजोबा न चुकता आपल्याला ‘जय श्रीराम’ म्हणतात. पण बहुदा आपल्याला ग्रीट करण्यापेक्षा बहुदा त्यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यातच जास्त इंटरेस्ट असावा असं म्हणतात. उद्या त्यांनी ‘जय श्रीराम’ म्हटलं की त्यांना ‘वालेखुम सलाम’ म्हणून बघावं. असो. मेरे अरमां भी ले जाते, मेरी हसरत भी ले जाते, नजर से छीनकर अपनी हसीं सूरत भी ले जाते अंधेरे और इन आंखोंमें छा जाते तो अच्छा था…अण्णा.. हा द्वंद्वगीतांचा कार्यक्रम चांगला आहे. पण मध्येच निवेदकाचा चोरटा, फाजील, अभ्र्यात उशी कोंबावी तशा शब्दांत भावना कोंबण्याचा प्रयत्न करुन काढलेला आवाज कशाला? निवेदन करुच नका.. एकामागोमाग एक गाणी लावा फक्त. ते बरं उलट. पूछे कोई के दर्दे वफा कौन दे गया, रातों की जागने की सजा कौन दे गया, कहने पे हो मलाल… मलाल म्हणजे काय? कुणास ठाऊक… काय अर्थ आहे बघायला पाहिजे. उर्दू शिकायला पाहिजे होती. राहून गेलेल्या गोष्टी – ती यादी कमावलेल्या गोष्टींच्या यादीपेक्षा खूप मोठी आहे.. निलेश नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. चेहर्‍यावर हा इतका माज कसा काय कमावतात हे लोक? राज कुंद्रासारखा दिसतोय नाही का हा जरासा? शिल्पा शेट्टीच्या कॉस्मेटिक सर्जरीची चित्रं बघून मळमळायला होतंय. प्रीती झिंटानंही आपल्या नाकाचं काय करुन घेतलंय. आपल्या बाह्य रुपाबाबत एवढे का कॉन्शस असतात हे लोक? उगीच मायकेल जॅकसनला का नावं ठेवायची? अमिताभ बच्चनचाही टोप आता ओळखायला येतो. स्ट्रेचरवर आडवा असलाकी -आणि हल्ली बर्‍याच वेळा तसाच असतो तो – माकडटोपी घालून टोप पडणार नाही याची काळजी घेत असतो बिचारा. आपल्याच प्रतिमेत कैद झालेले हे दुर्दैवी लोक – राजेश खन्नाला तर त्या हॅवेल्सच्या जाहिरातीत बघवत नाही. दिलीपकुमारला तर म्हणे आता जेवताना आपल्या अंगावर सांडलेलंही कळत नाही. मग केसांना तो काळाभोर कलप करण्याचा अट्टाहास कशासाठी? समाजातल्या खटकणार्‍या गोष्टीत तेंडुलकरांनी कलप केलेले केस असं लिहिलेलं आहे. ते किती खोल आहे हे असलं काही आठवलं की कळतं..वहशत-ए-दिल, वहशनो-जार से रोकीं ना गयी, किसी खंजर किसी तलवार से रोकीं ना गयी, इश्क मजनू की वो आवाज है जिसके आगे कोई लैला किसी दीवार से रोकीं ना गयी.. अकरा मिनिटांची कव्वाली -रचणारेही थोर आणि ती सिनेमात ठेवणारेही थोर. कव्वालीत कृष्ण आणि राधेचा उल्लेख असलेलं दुसरं उदाहरण आपल्याला तरी आठवत नाही. खरं तर त्या काळात जातीचा कलेशी फारसा संबंधच नसावा. मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया, हमनें उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने बक्षी थी हमें एक ही धरती , हमनें कहीं भारत कहीं इरान बनाया…. ‘ओहोहो.. काय इकडे कुणीकडे? अस्सं? रोज येता? मीपण… मग इतके दिवस कसे काय भेटलो नाही… असो, बाकी काय म्हणताय? परवा त्या हिच्या लग्नात दिसला नाहीत? लग्न ना? अगदी जोरात.. त्याना काय हो… बारातेरा लाख उडवले म्हणतात..अग्दी साग्रसंगीत झालं.. सीमांतपूजनापासून गोदभराई.. आपलं… बिदाईपर्यंत… सीडी बघीतली असेलच तुम्ही… सगळ्या पोरी नुसत्या नाचत होत्या जीजू जीजू म्हणून.. मेहंदी, डीजे, चपला लपवणं.. काय छान लग्नं करतात हो हल्ली. अगदी प्रोफेशनल..असायला पाहिजे होता तुम्ही.. मजा आली… बराय, मग रोज येता तर भेटू परत…’ चला, आता या रस्त्यावर परत फिरायला यायची सोय नाही. बर. बघू. शोधू नवे रस्ते….पहाडोंको चंचल किरन चूमती है, हवा हर नदी का बदन चूमती है, यहां से वहां तक है छाओं के सायें…शुभम फुड्स.. आता आधी शुभम हे नाव तर नंतर फुडस कशाला आणि हे पाय मोडलेला म जोडायचं काय एक खूळ आहे कुणास ठाऊक. परवा काय बघितलं तर चक्षुम ऑप्टिक्स म्हणे. आणि फुड्स असं नका रे लिहू. उच्चार कसा करतो आपण? फूssss ड असा करतो की नाही? जरा र्‍ह्स्वदीर्घाचे नियम पाळा रे. अरुंद पुल म्हणे आता हा पूल इतका अरुंद आहे का की त्यावर पू चा दीर्घ उकारही मावणार नाही? पण जाऊ द्या. भाषेवर अत्याचार करणारे आणि घरातही हिंसाचार करणारे जर त्याचं समर्थनच करत असतील तर प्रश्नच मिटला. व्हेन स्मॉल पीपल बिगिन टु कास्ट लाँग शॅडोज, इट इज दी टाईम फॉर दी सन टु सेट..बापरे, हा चढ म्हणजे अगदी कस बघणाराच आहे…किस लिये मिल मिल के दिल टूटते हैं, किस लिये बन बन महल टूटते हैं, पत्थर से पूछा, शीशे से पूछा, खामोश है सबकी जुबां… द्विजेन मुखर्जीच्या आवाजात काय वाईट आहे? आणि सुबीर सेनच्या? पण हे लोक काही फार पुढे आले नाहीत. यांना आणि ब्रेक मिळाले ते बहुतेक सलील चौधरींकडे किंवा इतर बंगाली प्रॉड्यूसर -डायरेक्टर लोकांकडेच. शेवटी काय ग्रूपिझम सगळीकडेच आहे हो. गर्भाचि आवडी, मातीचा डोहळा तेथिचा जिव्हाळा तेथे बिंबे.. बंगाली मस्त असतात पण.पण बंगाल्यांना ‘बोंग’ म्हणतात ते बाकी फार चीप वाटतं. तो अभिषेक बच्चन परवा कुठल्या तरी मुलाखतीत राणी मुखर्जीला सारखा ‘बोंग’ ‘बोंग’ म्हणत होता. अभिषेक आहेच साला चीप. इतक्या गोड बंगाल्यांना ‘बोंग’ म्हणणं म्हणजे नाजूक काचसामानाच्या दुकानात रेडा शिरल्यासारखं वाटतं. कुठं वाचलं होतं बरं हे वाक्य? नाजूक काचसामानाच्या दुकानात रेडा…? खांडेकरांचा लघुनिबंध होता बहुतेक. ‘अच्छा’ या शब्दाच्या वापराबद्दल त्यांनी असं म्हटलं होतं, असं वाटतंय. जब रात जरा शबनम पे ढले, लहरायी हुई वो जुल्फ खुले, नजरोंसे नजर एक भेद कहे, दिल दिलसे कहे एक अफसाना… मेंडोलीन मस्त वाजवलं आहे. इतकंसं नऊ इंचांचं वाद्य. सज्जाद हुसेनने म्हणे एकदा सवाई गंधर्व महोत्सवात त्यावर कुठलासा राग वाजवला होता. इलाही है तूफान है किस बला का, के हाथों से छूटा है दामन हया का, खुदा की कसम आज दिल कह रहा है, के लुट जाऊं मै नाम लेकर वफा का…
पावसानं दमट झालेलं गवत. बुटाला चिखल चिकटून आता ते जड व्हायला लागलेत. ‘सकाळ’चा बातमीदार असता तर त्यानं ‘भारी’ व्हायला लागलेत असं म्हटलं असतं. बापरे! ‘पैर भारी होना’ याचा अर्थ भलताच आहे! मराठी कुठे, हिंदी कुठे…पण आता अशी जुनाट मते न बाळगलेली बरी. एका भाषेत दुसर्‍या भाषेतले शब्द मिसळले तर वावगं काय, असाच एकूण सूर दिसतो. अगदी आशा बगेंसारखी लेखिकाही ‘मनवणे’ हे क्रियापद सरसकट वापरते. पण काय ठाऊक, असेल कदाचित तो नागपुरी बाज. ‘केल्या गेली आहे…’ सारखा…मनवणे,पकाऊ,निपटारा… जय हो! सुनो, तुम्हारा असली नाम क्या है? जी… मेरा असली नाम जॉनी. और नकली? नकलीभी जॉनी. इसके अलावाभी कोई नाम है? जी हां.. जानी.. आपको ज्यादा पसंद है? विजय आनंदवर एखादा लेख लिहायला पाहिजे. जरा पंख झटक, गयी धूल अटक और लचक मचक के दूर भटक, उद डगर डगर कसबे कूचे, नुक्कड बस्ती… मीरा के प्रभू, गिरिधर नागर, प्रभू चरणोंमें, हरी चरणोंमें, शाम चरणोंमें लागी नजरीया….अभी कल तलक तो मोहब्बत जवान थी मिलन ही मिलन था, जुदाई कहा थी मगर आज दोनों ही बेआसरा है….शनिवार आहे वाटतं आज. रस्त्याच्या कडेला एका फूटपाथवर शनिदेवाच्या देवळाचं अतिक्रमण झालेलं आहे. त्या देवळातल्याच एका दगडावर – आता दगडाला दुसरं काय म्हणणार? – तेल घालायला इतक्या सकाळीही गर्दी होऊ लागली आहे. मला बढती मिळू दे, माझ्या मुलीचं लग्न ठरु दे, माझ्या जमिनीच्या कज्ज्याचा निकाल माझ्या बाजूने लागू दे. ही एक गर्दी आणि चार पावलं पुढं दारुच्या दुकानात होऊ लागलेली गर्दी – दोन वेगळे जमाव – किंवा खरंतर एकच….चहाच्या टपर्‍या कुठेकुठे उघडू लागल्या आहेत. चहाचे पहिले अर्धे कप रस्त्यावर ओतलेले दिसत आहेत. बसेस, रिक्षा, ट्रकचे आवाज… ओ मेरी जां, ओ मेरी जां, मेरे को मजनू बना के, कहां चल दी कहां चल दी प्यार की पुंगी बजा के ….कोपर्‍यावरुन मी घराच्या दिशेने वळतो – आलं, जग आलं. रस्ता झाडणार्‍या बायका, देशी दारुच्या दुकानातली वर्दळ, त्यांच्या दारांवरचे मळकट, ओशट पडदे, रस्त्यावर सुरु झालेल्या पानाच्या पिचकार्‍या, आलं जग आलं..
दारात पेपर अडकवलेले आहेत….अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कडक उपाययोजना करणार…तत्वांवर आधारित युतीला आमचा विरोध नाही…बेदरकार चालकाचे तीन बळी…आलं.जग आलं…. मी थकून पंख्याखाली बसतो. बूट काढतो. ‘चहा दे गं अर्धा कप’…म्हणतो.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

7 Responses to शंभर मिनिटे

 1. इनिगोय कहते हैं:

  मस्तच आहे मुक्तक. ‘जय श्रीराम’ बरोबर ‘वालेखुम सलाम’ची जोडी लावायची कल्पना वाचून खूदकन् हसायला आलं.

  बाकी ते ‘जग आलं.. जग आलं’ चे घण पडायला लागले, की लागलेली समाधी खडाखड उतरून जाते, अगदी अगदी खरं!!

 2. Nitin कहते हैं:

  मुक्तक छानच झालंय.

  बाकी ही सगळी चांगली गाणी लावणारा रेडियो कुठे मिळतो हो?

 3. Mandar कहते हैं:

  Mast … mannada bharun rahile ahet lekhat.. zakas gaNi..
  Muktak khup avadala.. “loud thinking” mhanava asa..

 4. abhiruchidnyate कहते हैं:

  मस्त लिहिलं आहे.. अगदी आवडलं.

 5. एवढ्या मोठ्या लेखात ते देशी दारुचे दुकान तेवढे कळले.

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s