उत्क्रांती

कत्तलीच्या वाटे झुंजती कोंबडे
पडलेले सडे जागोजागी

बोलरोंची रांग स्कॉर्पिओंची रांग
क्वार्टरींची रांग टेबलावरी

ब्रेस्लेटे रेबॅन आयफोन रेबॉक
विवेकाला बाक सुखे देऊ

श्रावणात गर्जे डॉल्बी दणादण
सत्यनारायण कॉर्पोरेट

पोपट बोलती पोपट ऐकती
कुंठलेली मती या ठिकाणी

चारचाकीमध्ये साईरामधून
राँगवेमधून दामटता

नवस बोलले नवस फेडले
पापांचे डबोले झाले रिते

काय भले बुरे मला काय त्याचे
धरु काये वाचे मग्रुरीही

रस्त्यावर थुंकी विष्ठा आणि बोळे
यातुनि उमाळे दिव्य सनातन

ओरबाडू आज ओरबाडू उद्या
शिकवू ही विद्या मुलाबाळां

मेल्या म्हातारीच्या दिवसांची नशा
जितेपणी आशा अर्ध्या भाकरीची

शुभ शकुनांचे पुनीत दिशांचे
कौल-करण्यांचे पीक आले

शेंबडे नागडे रस्त्यांत भणंग
चोरे मन अंग पांढरपेशे

कधी कोणी कोठे नाकारील सारे
वाहतील वारे विध्वंसाचे

महाप्रलयाच्या उठतील लाटा
चिंबतील वाटा दाही दिशा

जखमी धरेची छाती उकलेल
नभी उसळेल अग्निरक्त

पडतील खच भग्न शरीरांचे
मानवी किड्यांचे निर्दालन

मग कुठेतरी कडाडेल वीज
पुन्हा एक बीज अंकुरेल
हिरवे पोपटी पुन्हा एक पान
ठेवुनिया भान उमलेल
थिजलेले सर्व विराट विशाल
किंचित हलेल पुढेमागे
गावंढळ जग किड्या कीटकांचे
अळ्या गांडुळांचे अवतरेल
क्षितिजापर्यंत नसेल तरंग
अथवा तवंग प्रगतीचा

जाणता निसर्ग ओळखेल हाक
थांबवेल चाक उत्क्रांतीचे

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

2 Responses to उत्क्रांती

  1. Nitin कहते हैं:

    जवळपास एक वर्षानंतर post …

    कविता मात्र अगदी अस्वस्थ करणारी !

  2. abhiruchidnyate कहते हैं:

    मी परत परत वाचतीये ही कविता.. रूखरूख लागून राहिली आहे काहीतरी.. किंवा एक अस्वस्थता..

टिप्पणी करे